परदेशातून आणलेल्या अल्पवयीन मुलीची मैत्रिणीनेच केली विक्री   

पुणे : मैत्रिणीसोबत सात ते आठ महिन्यांपूर्वी पुण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची बुधवार पेठेत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडीत मुलीने अपहरण झाल्यानंतर पळ काढून हडपसर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर, तेथे दिलेल्या तक्रारीवरून शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हा गुन्हा फरासखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. याप्रकऱणी एका महिलेला अटक केली असून, तिच्या साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
 
पीडीत सोळा वर्षांची मुलगी ही सात ते आठ महिन्यांपूर्वी सुमय्या या तिच्या मैत्रिणीसोबत बांगलादेशातून पुण्यात आली. त्यानंतर काही दिवस पीडीत मुलीला तिच्या मैत्रिणीने भोसरी येथे ठेवले. त्यानंतर आठ ते दहा दिवस पुण्यात फिरवले आणि तुळशीबाग येथील एका खोली ठेवले. तेथून तिला बुधवार पेठेत नेऊन तिची तीन लाखांत विक्री केली आणि तिच्या मैत्रिणीने बांगलादेशात पळ काढला.आरोपींनी पीडित मुलीला देहविक्रीच्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले.
 
तसेच, पीडितेला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली. ‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते.दरम्यान, २ एप्रिल रोजी पीडितेने बुधवार पेठेतून पळ काढला.  अखेर पीडितेने हिंमत करत हडपसर पोलिस ठाणे गाठले. हडपसर पोलिसांनी ’शून्य’ क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो आधी विश्रामबाग आणि नंतर फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. फरासखाना पोलिसांनी पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिला ज्याठिकाणी डांबून ठेवले होते, तेथे जाऊन एका महिलेला अटक केली. तसेच पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून एकूण ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी आणखी कुणा मुलीची अशाप्रकारे विक्री केली आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles